Tuesday, March 29, 2011

प्रत्यक्ष प्रमाणाचा अतिरेक

ज्यांचा तत्वज्ञानाशी संबंध असेल त्यांना प्रमाणाविषयी कल्पना असते. शिवाय ऊठ्सुठ ’ह्याला प्रमाण काय?’ असे विचारणारे ही प्रमाण शब्दाचा वापर करत असतात. अर्थात त्यांना त्याचा अर्थ पुरावा अशा अर्थाने अपेक्षित असतो. अनेकदा प्रमाण म्हणजे बहुतेकांना प्रत्यक्ष प्रमाणच अपेक्षित असते. व त्यातून वितंडवाद निर्माण होत राहतो, ह्यासाठी थोडे प्रत्यक्ष प्रमाणाचे विवेचन अयोग्य ठरणार नाही. भारतीय तत्वज्ञानामध्ये अनेक प्रमाणे वेगवेगळ्या संप्रदायांनी मानलेली आहेत. तरी त्यातील प्रमुख तीन म्हणजे , प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. ह्यातील फक्त प्रत्यक्ष प्रमाणालाच चार्वाकवादी कवटाळून बसलेले असतात. व तर्कदुष्टता करत असतात. त्याचे कारण आपण पाहणार आहोत.
सर्व आधुनिक विज्ञान हे ’अनुमान’ ह्या प्रमाणावर प्रामुख्याने आधारित आहे. कारण गणितीय सिध्दांत हा ह्या विज्ञानाचा बेस आहे. गणित अनुमानाशिवाय दुसरे काही नसते. अणुच्या घटकांचा शोध अनुमानानेच लागत गेला. प्रत्यक्ष एलेक्ट्रोन,प्रोटोन कोणाला दिसत नव्हते. डार्विनची अख्खी थेअरी जनुकीय समानते वरुन केलेले अनुमान नाही तर दुसरे काय ? इथे ही मास्यांचे , पक्षांचे अनुकुलन होतांना कोणी ही प्रत्यक्ष पाहू शकत नाही. बिग बन्ग थेअरी, कृष्णविवरांचा सिध्दांत ही खगोलीय अनुमाने आहेत. नारळीकरांना कृष्णविवर इंद्रियांना अनुभवायला आले असे घडलेले नाही. तेथे ते अनुमानाचाच आधार घेतात तरी ज्योतिषाला विरोध करतान मात्र ग्रहांचा परिणाम मनुष्यावर कसा होतो हे मला प्रत्यक्ष दाखवा म्हणून हट्ट धरतात. हे निव्वळ काही वैज्ञानिकच नाही तर प्रत्येक चार्वाकवादी (पुरोगामी/अंधश्रध्दा विरोधक) असाच दुराग्रह धरत असतो. ह्यामागील खरी गोम काय आहे ते आपण बघू.
ईश्वराने जगत निर्माण केले हे एक हेत्वाभास नसलेले अनुमान आहे. जसे प्रकाश हा किरणांच्या स्वरुपात आहे का द्र्व्याच्या स्वरुपात आहे हे जसे अनुमान आहे तसे. किंवा अणुच्या केंद्रका भोवती एलेक्ट्रोन फिरतो हे जसे अनुमान आहे. एलेक्ट्रोन्च्या निर्मितीचे किंवा त्याहून ही सूक्ष्म असलेल्या सब-एटोमिक पार्टिकल्सचे कारण सांगता येत नाही म्हणून एलेक्ट्रोनचे अस्तित्व कोणी नाकारत नाही. तसेच ईश्वराच्या जगत निर्मितीच्या अनुमानाबद्दल ही आहे. असा सरळ तर्क न स्वीकारता. बिग बन्ग, अमिनो असिड, इ. कल्पना चार्वाकवाद्यांना स्वीकाराव्याशा वाटतात. अंतिम कारण असणारे अनुमान श्रेष्ठ का चक्राकार फिरणारे अनुमान योग्य ह्याचे उत्तर निरनिराळ्या तत्ववेत्यांनी दिले आहे. हे सर्व वेगवेगळ्या संस्कृतीतले आहेत. वैदिक नाहीत. कांट,आरिस्टोटल,प्लॆटो,डेकार्ट हे वैदिक नाहीत. आधुनिक चार्वाकवादी ह्यांपेक्षा स्वत:ला बुध्दिमान समजत असतील तर त्यांची दुर्बुध्दी त्यांना लखलाभ असो. ईश्वराला विरोध करण्याचे कारण एकच अनैतिक जगण्याकरता त्यांना ईश्वर नकोसा होतो. हे कारण छुपे असते. ह्यांना नीतिनियम नको असतात , आपली बुध्दि अहंकाराने ग्रस्त आहे हे त्यांना मान्य नसते, मृत्यूच्या अनामिक भीतिने ते सतत पछाडलेले असतात , कदाचित नरक असेल तर आपल्याला तिथे असह्य छळ सोसावा लागेल ह्याची त्यांच्या अंतर्मनामध्ये भीती असते(पूर्वजन्मीच्या नरकभोगाची ही आठवण ही असू शकते). अशा सगळ्या न्यूनगंडातून ते आम्हाला ईश्वर दाखवा, स्वर्ग दाखवा, आत्मा दाखवा असे प्रश्न करू लागतात. साधे ज्योतिषाचेच पहा. कुणी ही ज्योतिषी हे मान्य करेल की ज्योतिष हे ग्रहांचि स्थिति व त्याचे मानवांवर होणाऱ्या परिणाम ह्यातील अनुमानांवर आधारित आहे. ग्रहांचे कोणते ही किरण नाहीत जे मानवावर पडून परिणाम करतात. चाओस थेअरी ज्यांना परिचित असेल ते जाणतील की विश्वातील प्रत्येक छोट्या घटनेचा अनेक मोठ्या घटनांशी संबंध असतो. ह्या दृष्य अनुमानाच्या आधारेच भविष्या सांगितले जाते. त्यासाठी मग , पत्रिका, हात, संख्याशास्त्र,पत्ते इ. वापरले जातात. दृश्य अनुमान व भविष्याच्या सिध्दतेचा त्याला मिळणारा आधार ह्यावर ज्योतिष शास्त्र आधारित आहे. हे समजुन न घेता ग्रह लाखो किमी दूर आहेत, ते मनुष्यावर परिणाम कसा करतील , परिणाम होताना आम्हाला का दिसत नाही असे अनेक कुतर्क करत राहतात. चंद्राचा परिणाम मानवी मनावर होतो हे निर्विवाद अनेकांनी सिध्द करून ही ते स्वीकारायची त्यांची तयारी नसते.कारण एकच धर्माविषयी आकस !
चार्वाकवाद्यांचे सतत एकच टुमणे असते. आम्हाला पाहायला द्या. एखाद्या प्रतिबंधित प्रयोगशाळेत जायला ही पात्रतेची आवश्यकता असते. कुणीही वेडगळ उठून तिथे जाउ शकत नाही. व मला प्रत्यक्ष दाखवाच म्हणू शकत नाही. तसेच स्वर्ग पाहाण्यासाठी ही काही पात्रतेची आवश्यकता आहे, योगातल्या सिध्दी मिळवण्यासाठी ही पात्रता आवश्यक आहे. पण पात्रता न मिळवता मला दाखवाच म्हणणारे , अणुभट्टीत शिरुन मला माझ्या शरिरावर किरणोत्सर्ग दाखवा म्हणणाऱ्या पेक्षा जास्त शहाणे नसतात. कर्मसिध्दान्त, ईश्वर, आत्मा, परलोक, ह्या भक्कम अनुमानाने सिध्द केलेल्या गोष्टी आहेत. चार्वाकवाद्यांची तर्काने ह्यांचे खंडंन करण्याची कुवत नसते(ह्यांचे सर्व तर्क हेत्वाभासस्वरुप असतात). मग ते मला प्रत्यक्ष दाखवाची रट लावतात. ज्योतिषांना ज्योतिष सिध्द करा म्हणणाऱ्यांनी आधी स्वत:च्या सवंगड्यांबरोबर कृष्णविवरांची यात्रा करुन , बिग बन्ग थेअरीला प्रत्यक्ष करावे व नंतर येऊन ज्योतिषाच्या सिध्दतेच्या गोष्टी बोलाव्यात.
साधे सूक्ष्मजीव पाहायला जर सूक्ष्मदर्शक लागतो, तर पारलौकिक गोष्टी पाहायला असाच पारलौकिक दर्शक लागेल हे ह्यांना समजू नये काय ? पण विज्ञाननिष्टेच्या नावाखाली सोयीस्करपणा करणाऱ्यांना कोण समजाउ शकेल ? ज्योतिष, धर्म, नीतिनियम, ईश्वर ह्यांची अनुमाने त्यांनी आधी समजून घ्यावीत व मग प्रत्यक्ष प्रमाण हाती धरावे. पण हे करण्यासाठी त्यांना चार्वाकवाद सोडावा लागेल त्याचे काय ?

No comments:

Post a Comment