थंडीचे दिवस होते.. तुम्हाला माहिती आहेच पुण्यातील थंडी कशी बोचरी असते ते...पण आता जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे तो थोडा ह्यापेक्षा ही अधिक बोचरा आहे... माझे प्रेरणास्थान व महान इतिहाससंशोधक व विचारवंत एम.आर.गुप्ता पुणेभेटीला आले होते. मी एम.ए. केल्यापासून मी त्यांचे विचार वाचत आहे...अगदी शास्त्रीय लेखन , भारताच्या इतिहासालेखनाला त्यांनी आपल्या नवीन दृष्टीने वेगळीच कलाटणी दिली... अर्थात तशी कलाटणी गेल्या शंभर वर्षापासूनच मिळाली आहे म्हणा..मॅक्सम्युल्लरने जे एकदा नियम ठरवले...ते आजतागायत अबाधित आहेत..(टिळक त्याला मोक्षमुल्लर म्हणत असत. बिचारे टिळक..ते ही त्यांच्या प्रभावाखाली आले...व त्यांनी आर्य़ांना उत्तर ध्रुवावर नेऊन ठेवले) हा मॅक्सम्युल्लर खरा आपला माणूस...त्याने डास कॅपिटल वाचले असेल काय???? असो विषयांतर झाले .. मी माझ्या प्रेरणास्थानाविषयी बोलत होतो.. गुप्तांचे नवीन संशोधन असे की त्यांनी वेदातील काही भाग गुप्त कालखंडात(इ.स. सातवे-आठवे शतक) रचला गेल्याचे सिध्द केले... हे फारच कठीण होते... पुराणात.. महाभारतात घालघुसड झाली हे सिध्द झालेच होते ..पण ह्यां बुर्झ्वांच्या प्रिय वेदात ही सरमिसळ??? ह्या महान संशोधनाबद्दल गुप्तांचा नावलौकिक जगभर झाला... जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने तर त्यांचा खास गौरव केला..(अर्थात हा आमचाच प्राचीन अड्डा आहे म्हणा) ..तर असा महान संशोधक पुण्यात आला होता...
डेक्कन कॉलेजात त्यांचे काम होते...पुण्यात त्यांचे व्याख्यान मी आयोजीत केले होते... हा मोठा सुवर्णक्षण होता.. पुणे तसे मार्क्सवादापासून प्रत्यक्ष लांब होते..पण वैचारिक क्षेत्रात मात्र इथे आमचा हात कोणी धरणार नाही... जिथे देशातील सगळी विद्यापीठे जिथे आमच्या विचारांच्या प्रभावाखाली आहेत...तिथे पुणे काय? इथे तर संशोधनाची सुरुवातच भांडारकरांसारख्यानी केली.. ज्यांचा बुर्झ्वांना तीव्र विरोध होता... मध्येच एक राजवाडेनामक भट उपटला व काही ही प्रलाप करु लागला... पण आम्ही अशी उपेक्षा केली...की आता त्यांच्या इतिहास संशोधन मंदिरात कोणी फिरकत ही नाही...आमच्याकडे एक कसब निर्विवाद आहे... कुणी कितीही पुरावे आणले तरी त्यांना बुर्झ्वाम्हणले की काम झाले.. इथे भारतात आम्ही त्यांना मनुवादी..प्रतिगामी.. पुनरुज्जीवनवादी अशी शेलकी विशेषणे वापरतो... विद्यापीठे ..वर्तमानपर्त्रे...प्रकाशनसंस्था आमच्या ताब्यात आहेत... ह्यांनी ढिगभर पुरावे आणले तरी ते खोटे आहेत म्हंटले की काम झाले... पुण्यातील काही द्वाड संशोधकानी वेदाचा काळ ५ ते ७ हजार वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न केला..पण त्यांना शास्त्रीय मान्यताच मिळू शकली नाही.. इ.स. पूर्व १५०० ही तर मॅक्सम्युल्लर ची मर्यादा.. आम्ही अश्मयुग..ताम्रयुग..लोहयुग..अशी एकाहून एक पाचर मारुन ठेवली आहे(डार्विनच्या नसलेल्या आत्म्याला शांति लाभो)... की जरा कोणी भारतातील इतिहास थोडा मागे नेऊ लागला की लगेच..म्हणायचे...तेव्हातर लोहयुग होते...तेव्हातर लेखनकलाच नव्हती.. अस बरच काही.. आणि पुराणातील पुरावे तर मान्यच करायचे नाहीत..ते तर मनुवाद्यांचे काल्पनिक ग्रंथ !.. एकदा वेदांचा काळ जवळचा केला आणि हे मनुवादी भारतात बाहेरुन आले हे दैवी (आम्ही त्याला निसर्गनियम म्हणतो) सत्य बनवले की... सारे संशोधनच सोपे झाले... मग हे प्रतिगामी कितीही ओरडोत... त्यांचे संशोधन शास्त्रीय होऊच शकणार नाही... महाभारत..रामायण काल्पनिक आहे हे तर पूर्वीच सिध्द झाले आहे ..त्यामुळे उरते काय? ज्या राजांचे नाव दगडावर लिहून ठेवले नाही..ते अस्तित्वातच नव्हते हे मान्य केले की संपले... ह्यांचे एकापेक्षा एक राजे असे आम्ही खाऊन टाकले... विक्रमादित्य, शालिवाहन ह्यांना इतिहासातूनच हद्दपार केले... पण ह्यांनी सुरु केलेले शक गेले दोन हजार वर्षे कसे चालू आहेत हे एकटा कार्ल मार्क्सच जाणू शकेल... आम्ही चन्द्रगुप्ताला ही असच हद्दपार करणार होतो.. पण तो शिंचा मॅगेस्थेनिस... तरी आम्ही एक करामत केलीच.. अलेक्झांडर ला मौर्य चन्द्रगुप्ताच्या समकालीन बनवले ..(जो वास्तविक गुप्त कुलातील चन्द्रगुप्ताच्या समकालीन होता.) हे करुन आम्ही ह्यांच्या इतिहासात तेराशे वर्षांची पाचर मारुन ठेवली आहे.. ह्यांच्या तेरा पिढ्यागेल्या तरी हे ती पाचर काढू शकणार नाहीत..... अरेरे पुन्हा विषयांतर झाले...
तर मी सांगत होतो.. गुप्तांविषयी ज्यांनी वेदांचा काही भाग इ.स. ७ व्या शतकात आणून ठेवला... व्याख्यानापूर्वी मी त्यांना शनिवारवाडा बघायला घेऊन गेलो...मनुवाद्यांचा अड्डा बघायला त्यांचा प्रथम विरोधच होता..पण.. मीच त्यांना सांगितले..की पेशव्यांच्या इतिहासासंबंधी तुम्ही काही नवीन दृष्टी देऊ शकता का बघा... मग ते तयार झाले... आम्ही वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी आलो... बाजीरावाच्या पुतळ्याकडे बघून त्यांनी एक सुस्कारा टाकला...
" इथे आत मध्ये उत्खनन केले तर काही अश्मयुगीन खापरे सापडतील काय?" त्यांनी विचारल..
" माहीत नाही... पण पेशव्यांच्या घरातील काही भांडी कुंडी सापडू शकतील...अशाने कोकणातून आलेल्या ह्या मनुवाद्यांना आदिवासी असंस्कृत ठरवता येईल काय?" मी विचारले..
" अंहं... त्यांना आदिवासी ठरवायच नाहीय .. तर त्यांचा उद्देश ..सातारा व कोल्हापूरची गादी बळकाउन भटशाही आणण्याचा होता हे सिध्द करायच आहे..."
" पण काशी अयोध्या मुक्त करण्यासंबंधी असलेल्या पेशव्यांच्या पत्रांचे काय? नाना फडणीस, शिंदे, माधवराव, बाजीराव ह्यांची अशी पत्रे आहेत ..?"
" कसली पत्रे ?? हे मनुवादी जर पुराणेच्या पुराणे थापा लिहू शकतात.. तर पत्रे बखरी बोगस आहेत हे सिध्द करणे काय अवघड ? आणि तुम्ही त्या नानाचे कसले नाव घेता... तो तर बाहेरख्याली .... तुम्ही तेंडुलकर वाचलेले दिसत नाहीत...?"
मी थोडा ओशाळलो... तेंडुलकर तर महाराष्टातील आमचे खरे पाईक...ज्याला घाशीराम आवडत नाही तो खरा पुरोगामी नाही असा आमचा एक उघड नियम आहे...
" अहो पण लोकांना अजुन ही पानिपत,स्वामी वाचायला आवडते..."
" वाचूदेत...एकदा आपले संशोधन झाले... की खास आपल्या लेखकाकडून पेशवे विरुध्द भोसले अशी एक हजार पानी फक्कड कादंबरी लिहून घेऊ.. बाय द वे .. तुम्ही नेमाडेंचे लेटेस्ट पुस्तक वाचले असेलच ..?" त्यांनी विचारले...
" नाही अजुन त्यात काय.. आपली नेहमीचीच मार्क्सवादी भंकसगिरी " मी उत्तरलो...
त्यांनी थोड माझ्याकडे आश्चर्याने पाहिल... व आम्ही कोकणी मनुवाद्यांच्या प्राचीन अड्ड्यात प्रवेश केला....................
एक जोरदार खिल्ली उडवणारे लेखन अनेक दिवसांनी वाचायला मिळाले.
ReplyDelete