Tuesday, April 12, 2011

प्राचीन वैदिक भूगोल व शहरे

वैदिक भूगोल समजुन घेताना भारतीय ज्योतिष वाड्मयाचा व पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा निष्कर्ष विचित्र बनतात . जम्बु द्वीपाचा म्हणजे प्रस्तुत पृथ्वीच्या प्राचीन भूगोलाचा फक्त आपण विचार येथे करणार आहोत. पुराणे व ज्योतिष ग्रंथांनुसार एकंदर सप्त द्वीपे आहेत, जम्बु ,प्लक्ष, शाल्मल, कुश ,क्रौञ्च, शाक, पुष्कर . त्यातील केवळ जम्बु द्वीप मानवी दृष्टीगम्य आहे. इतर दुसर्‍या डायमेंशन मध्ये आहेत. अनेक संशोधकांची इथेच चूक झाली व ते इतर ६ द्वीपे ह्या पृथ्वीवरच शोधत बसले. पुराणात स्पष्ट उल्लेख आहे, की जम्बु द्वीप लवणसागराने वेढलेले आहे. इतर द्वीपांभोवती असलेले सागर वेगळ्या द्रव्याचे आहेत. तेव्हा दृश्य पृथ्वी म्हणजे केवळ जम्बु द्वीप होय. जम्बुनद् हा एका जांभळट रंगाचा सुवर्णाचा प्रकार आहे. हे सगळ्यात उच्च दर्जाचे सुवर्ण आहे , जे ह्या पृथ्वी वरच उपलब्ध होते.(अजुन ही असेल) . तर जम्बु द्वीपाची विभागणी नऊ वर्षात म्हणजे देशात केली आहे. संस्कृतमध्ये देशाला वर्ष असे म्हणतात जसे भारतवर्ष ! . त्यांची स्थाने मेरु पर्वताला केन्द्र ठेऊन सांगितली आहेत. मेरु पर्वत म्हणजे पृथ्वीच्या केन्द्रातुन जाणारा दक्षिण-उत्तर अक्ष होय.ह्या नऊ वर्षांची माहिती खाली देत आहे.
१. भारतवर्ष- हिमालय ते कन्याकुमारी
२.किम्पुरुषवर्ष- इंडोनेशिया,मलेशिया,कम्बोडिया आदि आग्नेय भाग, इथे रामोपासना चालायची. अजुन ही चालते
३.हरिवर्ष- इथे नृसिंह उपासना चालायची
४.रम्यक- इथे मत्स्य अवताराची उपासना चालायची
५.हिरण्यमय-इथे कूर्मरुपात उपासना चालायची
६.उत्तरकुरु- हे म्हणजे सध्याची दक्षिण अमेरिका . ह्याचा आकार भारतासारखा धनुष्याकार वर्णिलेला आहे. इथे वराहरुपात उपासना चालायची
७.भद्राश्ववर्ष- हे म्हणजे चीनचा अतिपूर्वेकडचा भाग. कदाचित आता तिथे पॅसेफिक सागर आहे. इथे घोड्याचे डोके असलेल्या विष्णुमूर्तिची (हयग्रीव)उपासना व्हायची.
८.केतुमाल वर्ष- इथे कामदेवरुपात उपासना व्हायची , हे म्हणजे आफ्रिका खंड किंवा युरोप
९.इलावृत्त वर्ष- हे उत्तर ध्रुवाभोवती आहे. इथेच गन्धमादन पर्वत आहे. इथुन चार पवित्र नद्या चार दिशेला गेल्या. त्यातील एक म्हणजे गंगा, अन्य नद्या चक्षू(फरात- इराक मधील) , सीता(रशिया/चीन) ,भद्रा (उ. अमेरिका). अरबांच्या इतिहासानुसार, ह्या पवित्र नद्या नील्,फरात्,जेहु,सेहु अशा आहेत. जिज्ञासुना अधिक शोधता येईल.
हे झाले पुराणातील वर्णन, भास्कराचार्य सारखा गणिती ही ह्या वर्णनाला आपल्या ग्रंथात पुष्टी देतो. सूर्यसिध्दान्ता सारख्या प्रमाण ज्योतिष ग्रंथात तर प्राचीन शहरांची ही माहिती आहे. आपण जसे आता विषुवृत्त, रेखावृत्त इ. नकाशा करण्यासाठी संकल्पना वापरतो. तशाच कल्पना प्राचीन भारतीय ही वापरायचे. त्यांनी लंका हे प्राचीन बेट शून्य विषुवृत्तावर व शून्य पृथ्वी मध्य वृत्तावर मानले आहे. हे पृथ्वी मध्ये वृत्त आजच्या उज्जैन शहरातुन दक्षिण-उत्तर जाते. ह्या वृत्तावर दक्षिणेला हिन्दी महासागरात कुठे तरी लंका हे बेट होते .(कदाचित ते आताची लंका ही असू शकेल. सध्याची लंका विषुवृत्तापासुन ६ अंश उत्तरेला आहे)
ह्या प्राचीन लंका ह्या दिव्य शहरापासुन ९० अंशावर पूर्व-पश्चिम दोन शहरे होती. व १८० अंश विरूध्द एक शहर होते. ही चार शहरे देवांनी बांधलेली व अत्यंत प्रगत होती असा ज्योतिष ग्रंथात उल्लेख आहे. सूर्यसिध्दान्तात खालील उल्लेख आहे.
समन्तान् मेरुमध्यात् तु तुल्यभागेषु तोयधेः /
द्वीपिषु दिक्षु पूर्वादिनगर्यो देवनिर्मिताः //

भूवृत्तपादे पूर्वस्याम् यमकोटीति विश्रुता /
भद्राश्ववर्षे नगरी स्वर्णप्राकारतोरणा //

याम्यायाम् भारते वर्षे लङ्का तद्वन् महापुरी /
पश्चिमे केतुमालाख्ये रोमकाख्या प्रकीर्तिता //

उदक् सिद्धपुरी नाम कुरुवर्षे प्रकीर्तिता /
तस्याम् सिद्धा महात्मानो निवसन्ति गतव्यथाः /

{लंका ही भारतीय ज्योतिषानुसार ० अंश विषुवृत्तावर व ० अंश पृथ्वी मध्यवृत्तावर मानली आहे. हे मध्य वृत्त अवन्ती म्हणजे सध्याच्या ऊज्जैन शहरातून जात असे}
(लंका)भारतवर्ष व (सिध्दपुरी)उत्तरकुरूवर्ष आणि (यमकोटी)भद्राश्ववर्ष व (रोमक)केतुमाल्वर्ष ही प्राचीन देवनिर्मित शहरे परस्परांच्या १८० अंश समोर आहेत. सध्याच्या नकाशानुसार सिद्धपुरी हे मेक्सिकोमध्ये, यमकोटी हे उत्तर पॅसेफ़िक मध्ये बेट असावे. रोमक हे प.आफ्रिकेमध्ये असेल, व लंका हे बेट एकतर सध्याची श्रीलंका असेल किंवा हिन्दी महासागरातील श्रीलंकेच्या खालचे एखादे बेट असेल.
मी आजच्या नकाशानुसार ह्यांचे अक्षांश-रेखांश खाली देत आहे, ज्यांना उत्सुकता आहे त्यांना अधिक शोध घेता येईल. गुगल अर्थ तसेच इतर देशांच्या मायथोलोजिचा हि उपयोग करता येईल.
लंका- ० अंश उत्तर, ९० अंश पूर्व
सिध्दपुरी-० अंश उत्तर ९० अंश पश्चिम
यमकोटी-० अंश उत्तर १८० अंश पश्चिम
रोमक- ० अंश उत्तर ० अंश पूर्व (ग्रीनीच शहराच्या सरळ रेषेते दक्षिणेला हे शहर आहे)

लाखो वर्षात समुद्र व इतर भूरचनेत वारंवार बदल झाल्यामुळे, वरील शहरे अचूक हुडकून काढणे अशक्यप्राय बनले आहे. तरी ही वरील माहिती कमी इंटरेस्टिंग नाही. ज्यांना प्राचीन इतिहासात रस आहे त्यांना मजेशीरवाटेल अशी आशा आहे.

ता.क.- वरील भूगोलानुसार एखादा नकाशा बनवता आला तर मी ह्या लवकरच ह्या लेखातच अपडेट करेन

संदर्भ-
सूर्यसिध्दान्त
विष्णु पुराण
सिध्दान्त-शिरोमणी-भास्कराचार्य

No comments:

Post a Comment