Thursday, July 28, 2011

काशीतील आठवणी-१

वाराणसीला जायच बरेच दिवसा पासुन मनात होते. एकदा गंगास्नान करुन सर्व पापांपासुन मुक्ती मिळाली की झाल. असो गंगास्नान तर झालच पण काशीला फिरण, जुनी जुनी मंदिर पाहण, जुनी पुस्तक पाहण, तत्वज्ञान-धर्म ह्यातील कुणा ताकदीच्या इसमाला भेटण असे बरेच उद्देश होते. पण काही कारणान पुढ पुढ जात राहिल. आणि गेलो तर किमान आठ दिवस तरी राहायच ठरवल होत. ट्रॅव्हल कंपन्यांसारख २ दिवसात स्पॉट उरकण्याच्या वृत्तीचा मला प्रचंड तिटकारा आहे. तुम्हाला त्या शहराच फिल ह्यायला हवा. जो बर्‍यापैकी दिवस तेथे राहिलात तरच येतो. भारतीय लोकांची प्रवास करण्याची मानसिकता उरकण्याची असते. नातेवाईकांना व मित्रांना इम्प्रेस करण्याकरिताच जणू ते प्रवास करत असतात. त्यांना आपण विदेशात जाउन आलो ह्याची प्रौढी मिरवायची असते. ह्याउलट परदेशी प्रवासी जे एकेकटे फिरतात, जिथे आवडेल तिथे मनसोक्त राहतात. ह्यासाठी पुरेसा वेळ काढणे व मूळ भटकण्याची , वेगवेगळ्या गोष्टी पाहाण्याची आवड जोपासणे गरजेचे आहे.सगळ्यात चिड येते ते कळपाने फिरणार्‍या कुटुंबियांची (ग्रुप ट्रॅव्हेलिंग) असो. तर ठरवल साधारण दोन महिने अगोदर की आता जायच वाराणसीच्या यात्रेला.तिकीटांची , राहायची सोय इ. ची पूर्वतयारी झाली . मुक्तपणे फिरायला दोन दोन व आता तीन तीन ही महिने आधी काढावी लागणारी रेल्वे तिकीटे हा एक मोठा अडथळा आहे. उगाचच अतिरिक्त प्लॅनिंग कराव लागत. तात्काळ तिकीटे वगैरे सगळी बोगसगिरी आहे. तर बरेच प्लॅनिंग करुन जून मधल्या एका ढगाळ सकाळी मी वाराणसी रेल्वे स्थानकावर उतरलो. उष्ण वार्‍याचा झोत उतरल्या उतरल्या जाणवला. ह्यासाठीच मी मुद्दामुन लेट जूनमध्ये जायच ठरवल होत. उत्तर भारतातला उन्हाळा चांगलीच परीक्षा बघतो. तिथे असच आपल्या सारख ऊन अंगावर खात फिरता येत नाही. कमी आर्द्रतेमुळे , पडणार ऊन जास्त तीव्र असत त्यामुळे सन स्ट्रोकची शिकार बरेच जण होतात. दिल्लीतील प्रवासाचा पूर्व अनुभव असल्याने वाराणसीला उन्हात शिजायचे नव्हते , त्यामुळे लेट जून बरा काळ होता. पहिला पाऊस येऊन गेल्याने गारवा निर्माण होईल अशी अपेक्षा होती. तेवढा गारवा नव्हता पणा ऊनही नव्हत. उतरल्या उतरल्या जेथे राहायची सोय केली होती त्यांना फोन लावला . काशी महाराष्ट्र भवनचे देव गुरुजी. त्यांनी कस व कुठे ह्यायच सांगितल . स्टेशन वर नेहमीच्या युपी भैय्यांचा ससेमिरा चुकवत बाहेर आलो. इथे सायकल रिक्षा मोठ्याप्रमाणात आहेत. मला पूर्वी त्यांच्यात बसणे मानवते विरुद्द वगैरे वाटायचे. पण मी तिच करायची ठरवल. त्यातुन शहराच दर्शन चांगल होत व फसवले जाण्याची ही शक्यता कमी. त्याप्रमाणेच घडल. विशेष ताप न देता, त्याने मला भैरोबा मंदिरा पाशी आणून सोडल. ह्या भागात आल्या आल्या लक्षात येत होत की हा काशीचा जुना भाग आहे.
मी गुरुजीनी पाठवलेल्या माणसाची वाट पाहात मंदिरापुढील चौकात उभा राहिलो इकडे तिकडे पाहात. अनेक पानांचे ठेले दिसत होते, चहाची ही अनेक दुकाने चालू होती. इथे गॅस वर कोणी चहा करत नाही. तर चूली वर करतात. दाट दुधाचा चूलीवर केलेला वाफाळता व कुल्हड मधून दिलेला चहा हे इथले चहाचे वैशिष्ट्य ! मला पुण्यातल्या अमृततुल्य चहाची आठवण झाली. व गुळम्ट पाणी ओतुन केलेल्या चहाला अमृततुल्य म्हणणार्‍या पुणेकरांची कीव आली. चहाचा एक सीप घेऊन मी पुढे एका ठिकाणी बरीच गर्दी दिसत होती तिचे निरीक्षण करु लागलो. जो माणूस मला घेउन जायला येणार होता तो तरी अजून आला नव्हता. म्हंटल बघाव जाऊन काय ते. म्हणून पुढे जाऊन पाहिल आणि अक्षरशः चाट पडलो. सरकारमान्य भांगेचे दुकान असा बोर्ड असलेली एक टपरी होती. एका छोट्या बोर्ड वर गोळी, पाने, पुडी असे वेगवेगळे दर ही लिहीलेले होते. बरेच उत्साही लोक तिथे खरेदी करीत होते. गांजा भारतात सरकारमान्य केव्हा पासुन झाला ह्याचा विचार करीत होतो तेवढ्यात गुरुजीनी पाठवल्या माणसाने मला हाक मारली. म्हंटल आधी रुम वर जाऊ. काशीतल्या पहिल्याच दिवशी गांजा घेऊन आउट होणे शहाणपणाचे होणार नाही :) जरी सरकारमान्य असला तरी!
त्या माणसा पाठोपाठ मी काशीच्या गल्ल्यातुन चालू लागलो. ह्याच त्या जगप्रसिध्द अरुंद गल्ल्या . गल्ल्या एवढ्या अरुंद व असंख्य फाटे फुटलेल्या आहेत, की पुढील आठ दिवसात मी कधी येथे वाट चुकलो नाही असे झाले नाही. अरुंद गल्ल्यातुनच समोरुन गाई येत जात असतात. त्यांना वाट देत आपल्याला जावे लागते. गाई बरोबर आता बाईक वाले ही त्याच अरुंद जागेतुन आता येतात. एकदम चिकटुन असलेले वाडे व असे अरुंद गल्ली बोळ हे अशा प्राचीन शहरांचे वैशिष्ट्य आहे. विशेषतः मुघल आक्रमणा नंतर ही जी शहरे टिकुन राहिली अशा शहरांचे प्राचीन भाग सारखेच आहेत. लखनौ बघा. जुनी दिल्ली बघा. अगदी जुन्या पुण्याचे वर्णन ही असेच आहे. सततच्या आक्रमणाच्या भीतीने व लपायला सोईस्कर व्हावे म्हणून अशी शहरे वसवली जात असावीत. कारण भारतीय शिल्पशास्त्रानुसार वाडे , रस्ते प्रशस्त असले पाहिजेत. असली बोळकांडे एक भयगंड दाखवतात आक्रमकांबद्द्लचा. असो
तर अनेक बोळातुन व चौकातुन फिरत आम्ही गुरुजींच्या वाड्यापाशी पोचलो. वाड्या बाहेर लिहीले होते काशी महाराष्ट्र भवन. गुरुजींनी अस्खलित मराठीत माझे स्वागत केले.
काशीच्या ह्या भागाला प्राचीन खंड म्हणतात. इथे चारशे मराठी लोकांची घरे आहेत. जे पेशव्यांबरोबर व नंतर इथे आले. काशीची मोगलांनी इतक्यांदा नासधूस केली की आता अस्तित्वात असलेली काशी फक्त पेशवे व अहिल्याबाई होळकर ह्यांनी पुन्हा उभारलेली आहे. पेशव्यांनी अनेक वाडे बांधले. जुन्या मंदिरांचा जीर्णोध्दार केला. गंगेवरील सर्व ८० घाट हे अहिल्याबाई होळकरांनी पुन्हा उभारलेले आहेत. काशी विश्वेश्वराचे देवालय ही त्यांनीच संपूर्ण नव्याने उभारले. त्यामुळे ह्या प्राचीन खंड भागात घरघुती मराठी वाटत होते. जवळच एका वाड्यात एक गणेश मंडळ होते. ' टिळकांनी इथे १८९४ मध्ये पुण्याबरोबरच गणेशोत्सव सुरु केला जो आजतागायत सुरु आहे'. गुरुजी माहिती सांगत होते. ह्याला म्हणतात जुन्या शहराचा फील. जो एका मॉडर्न लॉज वर राहुन व टूर कंपनी बरोबर फिरुन कधीच मिळाला नसता.
आता सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे गंगादर्शन व स्नान !. मी आवश्यक कपडे ,पळी भांडे इत्यादी घेऊन गंगेवर निघालो. तिथुन दुर्गा घाट जवळच आहे अस मला गुरुजीनी सांगितल. तरी वाटेत एकाला विचाराव लागलच . इथे कोणी गंगेला नदी असा उल्लेख करीत नाही. गंगाजी असा आदरानेच उल्लेख केला जातो. अखेर मी दुर्गा घाटावर पोचलो. पाऊस पडल्याने व वरुन पाणी सोडल्याने , गंगा बरीच वर आली होती. अथांग पात्र समोर दिसत होत. मला माहिती आहे, आजचा ९० समाज वर्ग गंगेतल्या किंवा अशा कुठल्या ही तीर्थक्षेत्रातल्या स्नानाची टिंगलटवाळी करणे पसंद करतो. मग काशी असो वा नाशिक. ह्यांचा एकच प्रश्न प्रदुषित पाण्याने , अस्वच्छ पाण्यात आंघोळ केल्याने शुध्दता कशी होणार ?? आता ह्या बैलांना हे कसे समजणार शुध्दी स्थूल देहाची करायची नसुन ज्या सूक्ष्म देहाला अनंत जन्मांची कर्मे व पापे चिकटली आहेत त्यांची करायची आहे. स्थूल शरीर स्वच्छ करायला उत्तम बॉडी वॉश लावुन शॉवर खाली उभारले की पुरे. गंगेवर कशाला जायच ? . जे शरीरापलीकडे पाहु शकत नाहीत त्यांना घाण शरीर व घाण पाणी हेच दिसणार. ज्यांचा पवित्र प्रवाहावर विश्वास आहे तेच अशा ठिकाणांच्या स्नानाने पवित्र होण्याची थोडी आशा राहते. मी ह्यावर विश्वास ठेवतो व हा विश्वास असाच कायम राहावा अशी अपेक्षा करतो. परलोकात तारणारी श्रध्दाच असते, तर्क करणारी बुध्दी नव्हे. ह्या श्रध्देनेच मी गंगेच्या पवित्र पाण्यात तिसरी बुडी मारली. व त्या रोखलेल्या क्षणभरच्या श्वासाने मला अनंत जन्माचे पुण्य परत मिळवुन दिले.

क्रमशः

1 comment:

  1. जे शरीरापलीकडे पाहु शकत नाहीत त्यांना घाण शरीर व घाण पाणी हेच दिसणार. ज्यांचा पवित्र प्रवाहावर विश्वास आहे तेच अशा ठिकाणांच्या स्नानाने पवित्र होण्याची थोडी आशा राहते. मी ह्यावर विश्वास ठेवतो व हा विश्वास असाच कायम राहावा अशी अपेक्षा करतो. परलोकात तारणारी श्रध्दाच असते, तर्क करणारी बुध्दी नव्हे. ह्या श्रध्देनेच मी गंगेच्या पवित्र पाण्यात तिसरी बुडी मारली. व त्या रोखलेल्या क्षणभरच्या श्वासाने मला अनंत जन्माचे पुण्य परत मिळवुन दिले. -
    खूपच मोलाचे विचार. साचेबद्ध विचार करणारे लोक धर्माच्या बाबतीत नैतिकतेचा मानभावी पुळका दाखवतात आणि व्यक्तिगत जीवनात मात्र आचरटपणाकडे झुकलेला तथाकथित लवचिकपणा. अशांना ही सणसणीत चपराकच आहे. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा

    ReplyDelete