Tuesday, June 12, 2012

सर्व मुक्तीच्या प्रश्नात एकाच्या मुक्तीचे उत्तर




दोन तत्वात जर संपूर्ण अनुभव जगताची विभागणी केली , तर ती दोन तत्वे म्हणजे आत्मा आणि शक्ती होत. एक सत्तामय साक्षी व दुसरी शून्य मयी परंतु , इच्छा ज्ञान क्रिया ह्यांची समष्टी . शक्ती हि आत्म्याचे अविभाज्य असे सामरस्यरुपी अंग आहे, ती सदा आहे, व सदा राहील , तिच्या आवरणाने आत्मा चेतनेकडून जडाकडे जातो व अंतिम पूर्ण स्थावर अशा जडात रुपांतरीत होतो. जडात परिणाम पावण्याची प्रक्रिया हि सदा चालू आहे, काहीन मोक्ष मिळाल्याने ती बंद होणार नाही. 


 मग काही जणांचा मोक्ष हा काय प्रकार आहे ?? 


 एकच शिव , शुद्ध विद्येपासून पृथ्वीपर्यंत अस्तित्वात आहे . जो पर्यंत पृथ्वी विद्यमान आहे, तो पर्यंत तो कधी हि पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही . वेदांती व माध्यमिक , निर्विकल्प समाधीच्याआधारे निर्वाण प्राप्तीचा दावा करतात .निर्विकल्प समाधीत त्यांना शून्यतेचा साक्षात्कार होतो ,. न कश्चित जायते जीवो , संभवः अस्य न विद्यते .................... हा प्रसिद्ध सिद्धांत . शून्याचा अनुभव आहे , जो नागार्जुन व गौडपाद दोघांनीही , ह्याच वाक्याने सांगितला आहे . पण हा शून्यतेचा साक्षात्कार , विश्वोत्पत्तीचे रहस्य उलगडू शकत नाही.
 कथम असतो वा सत अजायत ? हा प्रश्न शिल्लक राहतो .(विवर्तवाद हा त्याचे उत्तर नव्हे ) .


योगी अरविंद म्हणतात त्याप्रमाणे हि समाधी म्हणजे स्वर्गाचे दर्शन होताना झोपेत जाणे आहे, स्वर्गाची निर्मिती नव्हे ................ 


शिव हा शुद्ध विद्येपासून पृथ्वी पर्यंत सलग आहे. जोपर्यंत निर्विकल्प समाधीतील सत्य , व्यवहारात प्रत्यक्ष येत नाही , तो पर्यंत कोणी हि मुक्त होऊ शकत नाही. पृथ्वी व शिवाच्या मिलनाविना हे शक्य नाही . ऊर्ध्व सहस्राची जागृती करून , समाधीत जाता येईल , पण शरीराचे रुपांतर शक्य नाही .(अनेक योग्यान सहस्रारातील प्रवेशानंतर असह्य रोगांच्या हवाली व्हावे लागले ) 


मग ह्यांचा मोक्ष नक्की काय आहे ??
ऊर्ध्व सहस्राराच्या जागृतीने मिळणारा मोक्ष हा, अनेक युगांची व कल्पांची झोप आहे , जो पर्यंत अधो सहस्रारात विश्व कुंडलिनी विद्यमान आहे, तोपर्यंत खरा मोक्ष शक्य नाही . 


  एकाच्या रूपांतराने विश्वाचे रुपांतर


सामान्य योगी ज्याला कुंडलिनी वरती नेणे म्हणतात , ते म्हणजे वास्तविक पूर्ण कुंडलिनी शक्ती वरती नेणे असण्यापेक्षा , सुषुम्ना ह्या नाडीची जागृती आहे. सुषुम्ना व इतर नाड्या जागृत करून , निरनिराळ्या मार्गांनी , सहस्राराकडे जाता येते . खरी शक्ती जी पृथ्वीच्या हि खाली , अधो सहस्रात राहते, ती आतापर्यंत कधी हि वर गेलेली नाही. ज्यावेळी एका जीव शरीरात , हि कुंडलिनी रुपांतर करेल , तेव्हा पूर्ण विश्वाचे रुपांतर होईल , तो शेवट असेल .तोच अक्षय्य मोक्ष असेल .रक्त सहस्रारातील शक्ती हा सर्व जीवांचा समान आधार आहे , पृथ्वी ज्यावर फिरते , ती तो शेष आहे . ज्यावेळी तो शेष आपली कुंडले मोकळी करेल , त्यावेळी पृथ्वीचा शुद्ध विद्येकडे प्रवास सुरु होईल , आणि हा प्रवास प्रलयात्मक नसून , नित्य असणारा व सचेतन असेल . त्यावेळी सर्व मुक्त असतील . आतापर्यंत मुक्त झालेले (वेदांती व योगी ज्यांना मुक्त म्हणतात असे ) फक्त कोणत्या न कोणत्या लोकात गेले आहेत , त्यांना पुन्हा यावे लागेल . ज्ञानाने मोक्ष हे फक्त पारमार्थिक एका टोकाचे अंग आहे . वेद त्रिकांडा रुपी मोक्ष सांगतात . केवळ लय रुपी पारमार्थिक नाही . वेदांना अभिप्रेत मोक्षामध्ये अमरता आहे . ज्यासाठी , देवता व उपासना आहेत . हे रुपांतर जडात्मक , प्रलयासारखे नसून , चैतन्यपूर्ण असेल. शक्तीच्या सर्वात स्थूल आवरणाने पृथ्वीची निर्मिती झाली . पृथ्वीच्या खाली तिचा नित्य निवास आहे. जिने शिवाशी भांडून पाताळाच्या खाली संसार मांडला , जिने रामाला सोडून भूमीच्या खाली प्रवेश केला , ती महान माता , जेव्हा आपली शक्ती खुली करेल , तेव्हा पृथ्वीचे रुपांतर सुरु होईल . सामान्य प्रलयाच्या वेळी होते तसे लयाकडे न होता , ते रुपांतर होईल, शाश्वत सुखमय , परम सौंदर्यशाली , अमर , अक्षय्य अशा स्वर्गाकडे !! ते खरे परम पद असेल . त्यावेळी भगवान विष्णूने पाताळात ढकललेला , महान असुर बळी , स्वर्गाचा राजा बनेल . 
 योगी अरविंदांच्या भाषेत ते Superamental विश्व असेल व त्यातील मानव Superhuman असतील ........